Dangar Recipe : कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील निसर्गाप्रमाणेच येथील खाद्य संस्कृती देखील प्रसिद्ध आहे. कोकणातील खाद्य संस्कृती पैकी आज आपण विविध धान्यांच्या आणि डाळींच्या मिश्रणापासून बनवले जाणारे डांगर हा पौष्टिक पदार्थ कसा बनवतात हे पाहू. डांगर हा कोकणातील पारंपारिक चवदार पदार्थ असून याची पाककृती देखील सोपी आहे. डांगर हे भाकरी, भात, चपाती सोबत खाऊ शकता. उन्हाळ्यात जेव्हा पालेभाज्यांची कमतरता असते त्यावेळेस हा पदार्थ भाजीची कमतरता पूर्ण करतो. कोकणात घराघरात बनवले जाणारे डांगर ही कोकणातील पारंपारिक आणि प्रसिद्ध अशी रेसिपी आहे जी चवीला उत्कृष्ट तर आहेच आणि पौष्टिक देखील आहे. सदर लेखांमध्ये डांगर बनवण्याची पारंपरिक पाककृती त्याचे फायदे आणि महत्त्वाच्या टिप्स पाहू. चला तर मग झटपट तयार होणारा हा पदार्थ बनवू.
Dangar Recipe

👤४ जणांसाठी 🕑 १० मिनिटे
साहित्य
- १ कप तांदूळ
- १/४ कप चणा डाळ
- १/२ कप उडीद डाळ
- १/२ कप दही
- १ टेबल स्पून धने
- १ टेबल स्पून जिरे
- १ टेबल स्पून हळद
- १/४ मिरची पावडर
- २-३ लवंग
- २-३ काळी मिरी
- २ सुक्या लाल मिरच्या
- १ इंच दालचिनीचा तुकडा
- १ इंच आल्याचा किस
- १/२ टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट
- चवीनुसार मीठ
- कढीपत्ता
- चिरलेल्या २ हिरव्या मिरच्या
- चिरलेला १ कांदा
- कोथिंबीर
- तेल
Dangar Recipe कृती

- सर्वप्रथम वर दिलेले सर्व धान्य, डाळी, धने भाजून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
- एका बाऊलमध्ये सर्व धान्यांचे बारीक केलेले मिश्रण घ्या, त्यामध्ये तिखट, चवीनुसार मीठ, शेंगदाणा कूट, चिरलेला कांदा, मिरची – कोथिंबीर, आले आणि दही घाला.
- सर्व मिश्रण छान असे एकजीव करून घ्या. आवश्यकता असल्यास थोडे पाणी वापरू शकता. मिश्रण जास्त घट्ट अथवा जास्त पातळ नको हे मिश्रण मध्यम असू द्या.
- आता फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या त्यामध्ये मोहरी, जिरे, सुखी लाल मिरची, कढीपत्ता हळद इत्यादी फोडणीचे साहित्य टाकून फोडणी तयार करा.
- ही फोडणी मिक्स केलेल्या डांगरच्या मिश्रणावर द्या.
- फोडणी देऊन झाल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्या.
याप्रकारे झटपट तयार होणारे चवदार असे डांगर खाण्यासाठी तयार आहे, हे डांगर तुम्ही भाकरी, ठेचा आणि कांद्यासोबत नक्की ट्राय करा.
फायदे –
उडीद डाळ प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. दहीमुळे पचनास मदत होते आणि शरीराला प्रोबायोटिक्स मिळतात. कांदा आणि कोथिंबीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
टिप्स –
डाळ भाजताना मंद आचेवर भाजा, नाहीतर ती कडू होऊ शकते. पीठ तयार करून कोरड्या भांड्यामध्ये ठेवल्यास ते १५ दिवस टिकते. दही ऐवजी ताक किंवा पाणी वापरून बनवता येते. मेतकूट पीठ वापरूनही डांगर बनवता येते.
डांगर हा कमी वेळात आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून बनवता येणारा चवदार पदार्थ आहे. कोकणच्या पारंपारिक जेवणात त्याला विशेष स्थान आहे. हा पदार्थ न केवळ पौष्टिक आहे, तर तो उन्हाळ्यात शरीराला थंडही ठेवतो. तुम्ही ही रेसिपी वापरून आजच घरी कोकणी चव अनुभवू शकता…!